सोमवार संध्याकाळ ची वेळ, ऑफिस च कामकाज आवरुन दुकानात रुजु होण्याची घाई, त्यातच फोन ने आवाज दिला, हॅल्लो ....... (पलिकडुन) कुठय रे ....... वर्कशॉप वर ये (फोन कट), या २ सेकंदाच्या फोन ने वीज चमकावी तस काहीस झाल आणि अनिल च्या डोक्यात शिजत असलेल्या भटकंती प्लान चा वास आला, लागलीच १० मिनिटात काम उरकुन वर्कशॉप वर दाखल झालो, अनिल ने एक भन्नाट प्लान समोऱ ठेवला, भटकंती हे आई नंतरचे पहील्या क्रमांकाच प्रेम असल्यामुळे नाही म्हणन्याचा प्रश्नच आला नाही, आषाढ महीन्यातील मंगळवार म्हणजे अनिल ची हक्काची सुट्टी, आणि बुधवार म्हणजे माझी हक्काची सुट्टी, असा दोघाना सुटेबल होणारा प्लान, दोन दिवस - ३ किल्ले - २ लेणी - (अंदाजे) १००० किमी ची बाईकिंग, सुरुवातीला कस - काय हे प्रश्न पडलेच, पण हिम्मते मर्दा, तो मदत दे खुदा अस म्हनतात ना, तसच काहीतरी झाल....... आमच्या अचानक ठरनार्या प्लान मुळे बाकी इतर मावळ्यांची नेहमीप्रमाणे नकारघंटा आली, ती पदरात पाडुन लागलीच घरी आलो, आणि आम्ही मोहीमेवर जानार असल्याची वार्ता दिली, घरातुन सुद्धा नेहमीप्रमाणे नकारघंटा वाजलीच, पण मागे हटतोय ते आम्ही कसले, काही शुल्लक गोष्टी सोडल्या तर बॅग अशीही भरलेलीच असते, ती उचलली आणी मोहीमेसाठी सज्ज झालो, अनिलराव त्यांचा घोडा (Yamaha Fezer 150) घेवुन हजर झाले, व सोमवारी रात्री ठीक ११:३० ला आमच्या मोहीमेची सुरुवात झाली, ठरलेल्या आराखड्याप्रमाने पहाटे ७ पर्यंत जंजाळा किल्ला च्या पायथ्याशी पोहोचणे अपेक्षीत होते, हा ट्रेक प्लान आम्हा दोघांचाच होता परंतु पावसाला पण आमच्यासोबतच ट्रेक ला यायच होत बहुदा, असो .....तर त्यालाही सोबत घेतल, यामुळे नेहमीप्रमाणे बाईक काही बुंगवता आली नाही, त्यातच आधीच्या दोन-तीन दिवसाच्या कामाच्या गाड्याने शरीर दमलेले असल्यामुळे डोळे झोपेच्या अधीन व्हा असे बजावत होते, जास्तीचा आगावुपणा नको म्हणुन हायवे च्या जवळपास एखादे मंदिर दिसते का ते बघितले पुढे - पाठीमागे १० किमी पर्यंत तरी अंग टाकण्यासाठी कोणतीही जागा नाही याचा अंदाज आला, मग मी एक नामी शक्कल लढवली व एका पेट्रोल पंपावर काही काळ अंग टाकुया असे सुचवले, लागलीच एक पेट्रोलपंप दिसला गाडी वळवली, व अंग टाकण्यासाठी नजरेनेच जागा शोधु लागलो, तिथे रात्रपाळी वर काम करणार्या कामगाराला प्रथम दर्शनी आम्ही चोर - लुटारु वाटलो म्हणुन त्याने त्याच्या इतर दोन सहकार्याना उठविले, बिचार्यांची झोप-मोड झाली, त्यानी येवुन आमची थोडी चौकशी केली, आम्ही आमचा उद्देश सांगितल्यावर त्यानी स्वत:हुन आम्हाला झोपायला जागा दिली, मग आम्ही पण १ ते १:३० तास ताणुन दिली, पुन्हा पहाटे ५:३० ला पुढचा प्रवास चालु केला, सरतेशेवटी आराखड्यानुसार खुपच उशीरा म्हणजे सकाळी ७ ला आम्ही औरंगाबाद ला पोहोचलो,
ठरल्याप्रमाणे जालना रोड विचारत आम्ही मोंढा नाका चौकात आलो, बऱ्याच वेळापासुन प्रतिक्षेत असलेला टपरी वरचा वाफाळता चहा दिसला, लागलीच गाडी वळवली, सोबत आलेल्या पावसामुळे ठरलेल्या गोष्टींच गणित चुकायला लागल होत, त्यातच हा पाऊस थांबायची चिन्ह दिसत नव्हती म्हणुन ठरलेल्या आराखड्यात बदल केला जावा असा प्रस्ताव अनिलरावांकडुन आला, परिस्थितीचा अंदाज घेवुन वाफाळत्या चहा चा घोट घेत मी पण लागलीच होकार दिला, व दुसऱ्या दिवशीचा प्लान आज करायचे ठरले, आजुबाजुची इतर लोकांची चाललेली सकाळची कामाची गडबड, शेजारीच चाललेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे सायकलस्वार आणि पायी चालनार्या लोकांची कसरत, पावसात पण आपले काम चोख करणारा पेपरवाला, रिक्षा चालक-मालक यांची प्रवासीवाहतूक अशी अनेक दृश्य न्याहाळत हातातला चहा संपवला आणि गाडीला चावी दिली, खऱ्या अर्थाने ट्रेक ची सुरुवात झाली, तेथुन काही मिनिटांत भांगसाई गड येथे पोहोचलो, लांबुन किल्ला छोटा वाटत असला तरी पण स्थानिक लोकानी व भांगसाई देवीच्या भक्तान्नी पुर्ण गड पायऱ्या केल्यामुळे थोडी का होइना दमछाक होतेच, चढताना सुरुवातीच्या टप्प्यावर एक आश्रमशाळा आहे, त्याच्या वास्तुला डावीकडे ठेवत एका प्राचीन महादेव मंदिर ला वळसा घालुन मुख्य पायऱ्या असलेल्या वाटेला लागतो, त्या महादेव मंदिराच्या जवळच त्या मंदिराचे नवीन लाल दगडातले बांधकाम चालु आहे, बांधकाम जरी नविन असले तरीपण त्याच्या बांधकामाच्या शैलीतुन ते भव्य व प्राचिनच आहे असे भासते, ते न्याहाळत आम्ही मुख्य वाटेला लागलो, रात्रभर प्रवास आणि सोबत पाऊस यामुळे अंगात बऱ्यापैकी थंडी मुरली होती, चढाई सोपीच होती पण थकवा जाणवत होता, रमत गमत निसर्गाचा आनद घेत अर्ध्या-पाऊण तासात गडावर पोहोचलो, भांगसी गड चढतांना गडमाथ्याच्या थोडं खाली उजव्या
बाजूला कातळात कोरलेली एक गुहा आहे. गुहेच्या पुढे सिमेंटच्या पायर्या
संपून कातळात खोदलेल्या पूरातन पायर्या लागतात. या पायर्या चढून गेल्यावर
कातळात कोरून काढलेल्या उत्तराभिमुख प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश
होतो. प्रवेशव्दाराची कमान मात्र उध्वस्त झालेली आहे. प्रवेशव्दाराच्या
डाव्या बाजूस तटबंदीचे अवशेष आहेत. प्रवेशव्दारातून गडमाथ्यावर प्रवेश
केल्यावर पूर्व - पश्चिम पसरलेला चिंचोळा गडमाथा दिसतो. गडावरील सर्व अवशेष
पश्चिमेला असल्यामुळे उजव्या बाजूला भांगसाई देवी मंदिराकडे चालत जावे. सुरुवातीला काही "सिझनेबल शॉपिंग मॉल" लागतात, त्यानंतर सिमेंट कॉंक्रिट मध्ये नुतनीकरण केलेल भांगसाई देवी च मंदिर, हे मंदिर तीन मजली आहे, आपल्या नजरेला दिसतो तो पहिला मजला, त्याखाली भुयारात मुख्य देवीची मुर्ती आहे, व त्याखाली ५-७ पायऱ्या उतरुन गेल की श्री दत्त ची मुर्ती आहे, व तेथुनच बाहेर पडायला मार्ग आहे, हा मार्ग पाण्यातुन जातो, हे सर्व बांधतानाचे नियोजन छान होते, पण श्री दत्त मंदिरातुन बाहेर पडतानाचे पाणी आज मितिस गटार सदृश्य आहे, कारण त्या पाण्यात मासे आहेत अस समजुन अनेक भाविक त्या पाण्यात ओल खोबर, मुरमुरे असे काहीबाही टाकत असतात, हे सर्व बघुन आल्या पावली परत तीन मजले चढून मुख्य मंदिरातुंच बाहेर पडलो, भांगसाई देवीच्या मंदिरामागे एक कोरड टाक आहे.
तेथून पुढे गेल्यावर डाव्या हाताला (दक्षिणेला) वळून खाली उतरावे. येथे
गडाच्या दुसर्या दक्षिणाभिमुख दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. या दरवाजा
समोरच कातळात खोदलेल्या गुहा आहेत. त्यांचा उपयोग देवडी प्रमाणे होत असावा.
आज या गुहांच्या वरचा दगड पडल्यामुळे या गुहा बुजलेल्या आहेत. हा दरवाजा
पाहून परत गडमाथ्यावर यावे. पुढे गेल्यावर कातळात खोदलेले एक खिडकी टाक
आहे. या टाक्यात मुळ आयताकार खोदलेल्या टाक्याच्या आत ४ चौकोनी खिडक्या
(झरोके) कोरलेल्या आहेत. या टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेल शिवलिंग व
नंदी आहे. या टाक्याच्या पुढे उजव्या हाताला (उत्तरेला) वळून खाली उतरावे.
येथे कातळाच्या पोटात तीन दालन असलेल खांबटाक कोरलेल आहे. या टाक्या समोरील
भिंतीत एक गोल झरोका कोरलेला आहे. हे टाक पाहून पुन्हा गडाच्या माथ्यावर
येऊन पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत एक जोड टाक पहायला मिळत. या
टाक्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. त्याला लागूनच एक कोरड पडलेलं टाक
पहायला मिळत. या टाक्याच्या तळाला एक आयताकृती खड्डा कोरून काढलेला आहे. या
टाक्याच्या जवळ एक बैठ घर बांधलेल आहे. येथून किल्ल्याचे पश्चिम टोक पाहून
प्रवेशव्दाराकडे परत आलो, गडमाथा बघताना fb आणि whatsapp च्या DP ची व्यवस्था केली आणि परतीच्या प्रवासास लागलो, या गडाची देखरेख कोण करत त्याना गाठुन किमान ते गटार सदृश्य पाणि तरी बदला हो अस सांगायच होत, पण ते भेटलेच नाही, किंवा कोणी मोठे विश्वस्थ सुध्हा भेटले नाही, सरते शेवटी एका मुलाला हे सर्व सांगितले आणि तो आमचा निरोप त्या विश्वस्थ पर्यंत पोहोचवेल असे वचन घेवुन गडावरुन उतरलो,
यानंतर मोर्चा देवगिरी (दौलताबाद) किल्ला कडे वळवला, हा किल्ला काही वर्षांपूर्वी शालेय शैक्षणिक सहली मध्ये बघितला असल्याने बऱ्यापैकी माहिती होता, त्यामुळे काही ठिकाणी फक्त नजर टाकली आणी लवकरात लवकर किल्ल्याच्या मुख्य भागाकडे निघालो, कारण या किल्याचा "भूलभुलैया मार्ग" मला खूप आवडतो, त्याकाळी सैनिक जीव मुठीत घेऊन जात असतील, पण आज ते सर्व आठवताना, आणी तो भूलभुलैया मार्ग पार करताना मी त्या सैनिकांच्या जागी स्वतः ला ठेवतो, जाम भीती वाटते, अंधाऱ्या मार्गात पुष्कळ प्रमाणात वटवाघुळ आहेत, ती कधी अंगावर येतील याचा काही नेम नाही, सध्या पाऊस पडून गेल्यामुळे त्या वटवाघुळांच्या विष्ठेचा खुपच कसातरी वास येत होता, वासाच्या वैतागाने त्या भुयारातून लवकर पळ काढला आणी गणेश मंदिर जवळ पोहोचलो, काही क्षण विसावलो, जुन्या सहलीच्या आठवणींना मनातल्या मनात उजाळा दिला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, आणी मंदिराच्या बाहेर निघणार तितक्यात त्या मंदिराच्या पुजारी म्हणवणाऱ्या काकुंनी सरळ-सरळ दक्षिणाच मागितली राव.... ती पण अशी, (पोरांनो... २०-३० रुपये देऊन जावा या काकुला, देवाचे चांगले आशीर्वाद मिळतील) काय बोलावं सुचेना, सर्वच देवदेवतांनी आपल्या काही प्रतिष्ठित ठिकाणी अकाऊंटंट ठेवल्याचे सर्वश्रुत आहे, पण किल्ल्यावरच्या मंदिरात भेटलेल्या ह्या काकु पहिल्याच अकाउंटंट, असो, आम्ही काही दक्षिणा दिली नाही, उलट त्याच्याच निदर्शनास काही गोष्टी आणून दिल्या, हा किल्ला शहरापासून थोडा लांब असल्यामुळे या किल्ल्याचा पण सिंहगड, प्रतापगड झालाय, त्या मंदिराच्या मागेच भविष्यातील नवदाम्पत्य बसलं होत, त्यांना काकु करवी थोडी दमदाटी केली, आणी त्यांना तिथुन हाकलले, पण खरंच त्यांना नसत हाकललं तर बर झाल असत अस नंतर वाटलं, कारण ते भविष्यातील नवदाम्पत्य आमच्या सोबतच "हातात हात" घालुन बारादरी इमारतीकडे चाललं होत, आमच्या पुढे-पाठीमागे एक ३०-३५ जणांचा ग्रुप होता ती सर्व मुले त्या कपल ला बघून जोरात ओरडत होत, आरं ए परश्या......... आर्ची आलीया आर्ची....., याची थोडी गंमत पण वाटली आणी थोडा राग पण आला, असो बारादरी च घुमटाकार छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी रूम आणी सज्जा बघत काही क्षण विसावलो, हलकी-फुलकी पोटपुजा केली, हे करत असताना तिथे एक वयस्कर काका होते, बहुतेक ते तिथे केअरटेकर असावेत, त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये गवळणीची चाल असणार कसलातरी गाणं लावलेलं होत, शब्द मराठी नव्हते म्हणून ते काही कळलं नाही, पण चाल सुरेख होती, ऐकताना छान वाटलं म्हंटल पोट-पुजा उरकलीकी विचारू त्यांना पण तेवढ्यावेळात ते कुठे गायब झाले कोणास ठाऊक , इकडं तिकडं बघीतल पण ते काय दिसले नाहीत, चाल मनात बसली होती, ती गुणगुणत बिजली दरवाजा आणी जनार्दन स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले, आणी "काला पहाड" तोफ न्याहाळत पुढे निघालो, समोरचा १०० पायऱ्या असणारा बुरुज चढून गेलो आणी सहलीच्या वेळी बघायची राहिलेली दुर्गा म्हणजेच "धुळधाण" तोफ जवळ पोहोचलो, खरंच या तोफेकडे बघीतले आणी समोरच्या दृष्टीस पडणाऱ्या किल्ल्याकडे बघीतले कि आपण अजिंक्य असल्यासारखे वाटते, इच्छा असूनही काही क्षण पाय तिथून निघाले नाहीत, काही क्षण तसाच बसून राहीलो, दूरवर पसरलेली "अंबारकोट"ची तटबंदी न्याहाळत काढता पाय घेतला, बुरुजाच्या १०० पायऱ्या उतारण्यापेक्षा पलीकडील बाजूने उडी मारून परतीच्या रस्त्याला लागता येईल म्हणून अनिल पाठोपाठ मीही उडी मारली, परंतु खाली निसरडे गवत होते, व उडी मारताना थोडा अंदाज चुकला, त्यामुळे पुढे महिनाभर (आधीच मोडलेल्या) डाव्या गुडघ्याने खूप त्रास दिला, असो, तुम्ही असे कोणतेही प्रयत्न करू नका ज्याने स्वतःला आणि किल्ल्याला दुखापत होईल, किल्ला उतरताना चाँद मिनार च्या बाजूला असलेल्या काही पडलेल्या इमारतेचे अवशेष आहेत, काही हमामखाने आहेत, ते बघीतले त्यात एका इमारतीमध्ये काही तोफा, काही मुर्त्यापण आहेत, सोबत बागबगीच्या आहे, हे बघत काही फोटोसेशन केले, ते बघून किल्ल्याच्या बाहेर आलो, बाहेर ५-६ विक्रेते आम्हाला बाजूला घेऊन काही जुनी नाणी दाखवत होते, व त्यांची अव्वाच्या-सव्वा किंमत सांगत होते, सगळं पुराण ऐकून घेतलं त्यांना रामराम करत गाडीला चावी दिली.
क्रमश ......
No comments:
Post a Comment