Game

असा कसा मी.... वेगळा, वेगळा

Tuesday, 25 July 2017

रायगड : माहेरघर, एक प्रेरणास्थान

नगारखान्यात नगारा वाजतोय रायगडी आवाज घुमतोय
गनिमांचा उडवूनि फज्जा माझा राजा सिंहासनी बसतोय

             या वर्षीची माझी आणी अनिल ची तिसरी फेरी, या वेळेला दोन नवीन मावळे तयार झाले, दोन बाईक्स, चार शिलेदार, असा बाणा सोमवारी ५ जून रोजी पुण्यातून पहाटे ४ वाजता नाशिक फाटा मार्गे रायगडास निघाला, ताम्हिणी घाटातला निसर्ग अनुभवत, सेल्फीकाढत, घाट संपल्यानंतर MIDC मध्ये वळताना कोपऱ्यावरच्या मावशींचा नेहमीचा चहाची चव घेत सकाळी निवांत ९ वाजता नेहमीप्रमाणे रायगड पायथ्यास बाईक्स पार्किंग केल्या, वाटेत रायगडाच्या अलीकडे एका वस्तीवर पोटभर "डोंगराची मैना" खाल्यामुळे, पोटात थोडीच जागा होती, तरीही एक-एक मिसळ संपवली आणी आपले बिर्हाड पाठीवर घेवून मनोमन राजांना मुजरा करून चढाईस सुरुवात केली, 

होईल तूमच्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा ...!!
तूमच्या भेटीसाठी राजे रायगडाकडं लागला डोळा ...!!
थाट हिंदवी स्वराज्याचा, श्री शिवराज्याभिषेक सोहळा ...!!
शत् जन्मीचे उपकार तूजं, मी साधा धारकरी मावळा ...!!

 "तुमच आमच नात काय, जय जिजाऊ, जय शिवराय"

              अश्या घोषणा देत, सोबतच्या नव्या मावळ्यांना जमेल तशी किल्याची-इतिहासाची माहिती देत रमत-गमत ११.३० च्या दरम्यान महादारावाज्यात प्रवेश केला, सकाळ पासूनच रायगड गर्दीने भरत होता, अनेक मावळे उत्साहात दाखल होत होते, थोडी विश्रांती घेतली, आणी हत्ती तलावाजवळून निघालो, हलक्याशा पावसाने आमचे स्वागत केले, सगळा थकवा क्षणात दूर झाला, अन्नछत्र मधून गरम गरम भात वरून सांबर याचा आस्वाद घेतला, आणी बाजारपेठेकडे आगेकूच केली, योग्य जागा बघून एका गाळ्यात तंबू लावला, पाठीवरच बिर्हाड उतरवल, आणी जरा ताणून दिली,

दुपारी २ च्या पुढे आवराआवर करून समग्र रायगड दर्शनास निघालो, सोबतच्या नवीन मावळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणी आनंद ओसंडून वाहत होता, सोबतीला आमसुलचा सरबत होताच, (सरबतापेक्षा त्यासोबत मिळणारे आमसूल फळ हे अतिशय छान लागते)

संध्याकाळी रायरेश्वराच्या मंदिरातून बाहेर पडताच होळीच्या माळावरच्या कार्यक्रमास सुरुवात होतीये याचा आवाज यायला लागला होता, लगबगीने तिकडे पोहचतच होतो, ढोल-ताशांचा आवाज जरा कुठे घुमायला लागलाच होता तेव्हढ्यात पावसाने एक जोरदार सलामी दिली,

आमच्या सोबतच इतरकाही मावळ्यांची पांगापांग झाली, पण ती क्षणिक, काही मिनिटातच सगळे मावळे लगेचच होळीच्या माळावर जमले, ताशाची तर्रर्र्र्र तरी, ढोलाचा निनाद, मावळ्याच्या घोषणा, सोबतच पावसाची साथ, वा...... सुंदर मिलाफ जमून आला, आणी सर्व मावळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं, ढोलच्या तालावर नाद पकडून सगळे पावसांत डोलत होते, मग एकापाठोपाठ मर्दानी खेळ सुरु झाले, दांडपट्टा, तलवारबाजी, भाले, काठ्या, लेझीम, असे नानाविध प्रकार बघत होतो,

काही वेळातच  अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती सोबतच काही प्रमुख पाहुणे मंडळींचे आगमन झाले, त्यात एक ताई नेहमीप्रमाणे घोड्यावर बसून रायगड चढून आली, सगळे तिचे कौतुक करीत तिच्यासोबत फोटो घेण्यासाठी पळाले, आम्ही गर्दीत न जाता मोबाईललाच त्रास दिला, सोबतच रायगड पूजन, शस्र पूजन, झाले, आणी नगारखान्यात कार्यक्रमाला सुरुवात झाली, आम्ही आत गर्दीत न जाता होळीच्या माळावर लावलेल्या स्क्रीनवरच या कार्यक्रमाचा आनंद घेतला, उत्साह म्हणतात ते असा, एक साधारण ७-८ वर्षाचा मुलगा सफेद कुडता, फेटा, कोल्हापुरी चप्पल घालून हातात लहानशी तलवार घेऊन संपूर्ण रायगड किल्ला फिरत होता, त्याची चालण्याची ऐट, त्याचा थाट म्हणजे, बस बघतच राहिलो, त्याच्या फोटो घेण्याचा प्रयत्न केला पण जमल नाही, असो, डोळ्यांनी आनंद घेतला, आणी पुन्हा अन्नछत्र कडे निघालो, मस्त मसाले भाताचा सुगंध दरवळत होता, तीन प्लेट मध्ये चौघांनी याछेथ ताव मारला, आणी बाजारपेठेत आलो, तंबूबाहेर निवांत गप्पा मारत बसलो, घराच्या घड्याळाप्रमाणे रात्री १० वाजता पोटातील कावळ्याने आवाज दिला, आणी पुन्हा मोर्चा रायरेश्वर मंदिराजवळच्या दादांकडे वळवला, कांद्याच बेसन, चटणी आणी तांदळाची भाकरी, सोबतच कांदा आणी आम्ही आणलेली घरची शेंगदाण्याची चटणी, कावळ्याची ओरड शांत झाली, दादांकडची चटणी आणी घराची शेंगदाणा मिरची एकदम खाल्यामुळे मीनल च्या नाका-तोंडातून पाणी आले, कशीबशी जेवली बिचारी, एव्हाना वातावरण कुंद झाले होते, थंडगार हवा, ढगाळ वातावरण, आणी सगळीकडे दाट धुके पसरलेले, ५-१० फुटांपेक्षा लांबचे दिसत नव्हते, रमत-गमत सावकाश या सगळ्याचा आनंद घेत तंबू जवळ येवून बसलो, होळीच्या माळावर नजर टाकली, दिसन तर काहीच नव्हते, फक्त जागरण गोंधळचा आवाज येत होता, देवेंद्र गड चढून-चालून थकला होता, त्यामुळे अनिल आणी देवेंद्र ने झोपायचा निर्णय घेतला, ते तंबूत आडवे झाले
              सकाळी तसं लवकरच उठलो, फ्रेश होवून मुख्य कार्यक्रमाकडे निघालो, परत बाजारपेठेत यायचं नव्हत म्हणून सगळा पसारा आवरला, तंबू सोडला, आणी बिर्हाड पाठीवर टाकल,

रायारेश्वरच दर्शन घेतलं आणी मुख्य राज्याभिषेक कार्यक्रमासाठी नगारखान्यात आलो, अहो घराच्या कार्यक्रमाला सुद्धा एव्हढ तयार होणार नाहेत, एव्हढ स्वत: तयार होवून आलेले,  प्रत्येकजन सफेद सदराच काय, भारदार शेरवानी काय, उच्च प्रतीचे फेटे, कोल्हापुरी चप्पला, आणी तलवार, काय तो थाट, काय तो उत्साह, मन अगदी उत्साहित झाल, नगारखान्याच्या दाराजवळ, ढोलपथकाच अतिशय उत्साहात वादन चालु होत, त्यांना सर्वजण साथ देत होते, एव्हाना नगारखाना तुडुंब भरला होता,आत बसायला तर सोडा, घुसायलासुद्धा जागा नव्हती, सगळीकडे केशरी फेटे, ध्वज पताका दिसत होत्या, स्टेजवरील निवेदकाने, फक्त "छत्रपती शिवाजी महाराज कि....." म्हणायचा अवकाश, संपूर्ण नगारखाना व किल्ला परिसरातून एकच "जय" चा आवाज घुमायचा, अंगावर काटाच यायचा, एव्हाना प्रमुख पाहुणे, आयोजक यांच्या उपस्थितीत मुख्य राज्याभिषेक कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती,


गर्दीतून पुढे जाऊन मेघडंबरी चा एखादा फोटो घ्यायची खूप इच्छा होती, पण ती अपूर्णच राहिली, नगारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या राजांचे निवासस्थान, राणीवसा, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, अश्या अनेक वास्तु बघितल्या, आणि परतीच्या प्रवासास निघावं लागत, (एक घरगुती दुख:द अडचण आली) जवळच पडलेली रिकामी पोती उचलली, जमेल तसं कचरा त्या पोत्यात कोंबून कोंबून भरला, आणी परत होळीच्या माळावर आलो, काही क्षण स्क्रीनवरून या सोहळ्याचा आनंद घेतला, राजांना मनोमन वंदन केल, आणी टकमक टोकाकडे मोर्चा वळविला, वाटेत रिकाम्या पाण्याच्या बाटल्याने पिशव्या भरत आलेल्या, त्या व्यवस्थित बांधल्या आणी टकमक टोकावर पोहोचलो, टकमक टोकावरचा बेभान वारा आज का कुणासठावुक पण शांत होता, मन पण थोड उदास झाल, उगीच दोनचार सेल्फी काढल्या, आणी मध्यल्या रस्त्याने महादारावाज्याजवळ पोहोचलो,रायगड चढताना किंवा रायगडावर वावरताना जी शिस्त दिसत होती, ती लगेचच गायब, आरडओरड, धक्काबुक्की, सगळ्यांना गड उतरायची घाई, लहानगे बघायचे नाहीत, की महिला मुली बघायच्या नाहीत, फक्त आसुरी आनंद, सगळ्या कार्यक्रमाचा आनंद क्षणात गायब, हे सगळ असच करायचं असत तर गड किल्ल्यांवर येतातच का हि नालायक मंडळी, कितीही सांगा, सांगणार्याचा घसा कोरडा आणी यांच पालथ्या घड्यावर पाणी, काही स्वयंसेवक, पोलीस मित्र ओरडून सांगत होते, पण ऐकेल ती ही कार्टी कुठली, अथक परिश्रमातून किळसवाण्या वागण्यातून ३ तासांनी गड उतरलो, बाईक्स ला चावी दिली, आणी पहिला आवाज कानी घुमला, ए परश्या ....... आर्ची आलीय आर्ची, संपल सगलं,
                      उतरताना घेतलेले आंबे, कोल्ड्रिंक्स ची एक बाटली घेतली आणी निजामपूर गाठलं, पोटपूजा केली आणी, ताम्हिणी घाटातून गप्पा मारत, गाणी ऐकत, म्हणत, सेल्फी काढत, आणी उद्यापासून सुरु होणाऱ्या रुटीन आयुष्याची गणित मांडत संध्याकाळी घरात प्रवेश केला.